पत्नीला पाठवत नसल्याच्या रागात जावयाने सासूचा धारधार शस्त्राने कापला गळा
आधुनिक केसरी न्यूज
तानाजी शेळगांवकर
नायगाव : पतीच्या छळाला कंटाळून पत्नी माहेरी आली होती. माहेरी आलेल्या पत्नीला का पाठवत नाहीस असा वाद घालून जावयाने घरासमोर बसलेल्या सासूचा चक्क गळा चिरुन खुन केल्याची खळबळजनक घटना (ता.११) रोजी सायंकाळी ४.३० च्या दरम्यान नरसी येथे घडली. खुनी जावयासह अन्य एकाला रामतीर्थ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदरच्या घटनेची माहिती समजताच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी नरसी येथे भेट दिली.
सविस्तर माहिती अशी की नरसी येथील बजरंग नगरातील वडार गल्लीत राहत असलेल्या लक्ष्मण रॅपनवाड यांची मुलगी उज्वला हिचे नांदेड येथील तरोडा खु येथे राहणारा अशोक किशन धोत्रे यांचे सोबत पाच वर्षापूर्वी लग्न झाले होते. मागील एक दोन वर्षापासून पती अशोक हा दारु पिऊन सतत मानसिक व शारीरिक छळ करत होता. त्यामुळे उज्वलाची आई पारुबाई लक्ष्मण रॅपनवाड हिने मुलीस दोन अपत्यासह नरसी येथे माहेरी घेऊन आली होती. अशोक धोत्रे हा पत्नीला नांदवायला पाठवा म्हणून आठ दिवसापुर्वी नरसी येथे आला होता पण सासू पारुबाई हिने मुलीस पाठवण्यास नकार तर दिलाच पण वागण्यात बदल करण्याचाही सल्ला दिल्याने परत गेला होता.
आठ दिवसापुर्वी सासरवाडीला गेल्यानंतरही सासूने पत्नीला पाठवले नाही. त्यामुळे त्याच्या डोक्यात राग होता मात्र पुन्हा (ता.११) डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान एका मित्राला सोबत घेवून जावाई अशोक धोत्रे हा मोटारसायकलवर नरसीला सासरवाडीत आला. सासरवाडीत आल्यानंतर माझ्या पत्नीला का पाठवत नाहीस असा सासू सोबत वाद घातला. यावेळी सासूसोबत शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी रागाच्या भरात जावयाने चक्क धारधार शस्त्राने सासूचा गळा कापला. गळा कापल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात सासू पडलेली असताना जावाई अशोक धोत्रे हा दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याने शेजाऱ्यांनी रामतीर्थ पोलिसांना घटनेची माहिती दिली. यावेळी नरसी चौकीत कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी अनिल रिंदकवाले यांनी घटनास्थळी धाव घेवून खुनी जावयाला ताब्यात घेतले.
त्यानंतर रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली व आरोपी अशोक धोत्रे यांच्यासह अन्य एकाला ताब्यात घेतले. गळा कापल्याने जागीच गतप्राण झालेल्या पारुबाई रँपनवाड यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नायगावच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती समजल्यावर अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. जावयाने सासूचा गळा कापून खुन केल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले.
Comment List