CDCC बँक नोकर भरतीत घोटाळा : आमदार जोरगेवारांचा विधानसभेत आरोप तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनी परीक्षाच पाडली बंद.
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती प्रकरणाबाबत नेहमीच सातत्याने आरोप प्रत्यारोप होत असतात. गेल्या काही दिवसांपासून हे नोकर भरती प्रकरण चांगलेच गाजत असताना आज चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून यात एका जागे करता तब्बल 40 लाख रुपये दलालांनी मागितले असल्याचा सनसनाटी आरोप थेट विधानसभेत केला आहे.
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत हा आरोप केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सुरुवातीपासूनच ही संपूर्ण भरती प्रक्रियाच संशयास्पद आहे असेही म्हटले आहे. दरम्यान चंद्रपूर मध्ये स्थानिक आंबेडकर महाविद्यालयामध्ये सीडीसीसी बँकेच्या नोकर भरतीची परीक्षा सुरू असताना संगणकात एकच प्रश्न व उत्तर अनेक वेळा येत असल्याने तसेच संगणकीय तांत्रिक बिघाडाने विद्यार्थ्यांनी गोंधळ घालत परीक्षाच बंद पाडली आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदासाठी २६१ व शिपाई पदासाठी ९७ अशा एकूण ३५८ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. २१, २२ व २३ डिसेंबर रोजी या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा सुरू असताना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात परीक्षेमध्ये चुकीचे प्रश्न दिल्याने विद्यार्थ्यांनी चांगलाच गोंधळ घातला आहे. राज्यातील सर्वच परीक्षा केंद्रावर ऑनलाईन संगणक सर्व्हर डाऊन झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर येत गोंधळ घालून परीक्षा बंद पाडली. यासंदर्भात काही विद्यार्थी चंद्रपूर बँकेत फोन करून याबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र बँकेकडून कोणीही फोन घेऊन उत्तर देत नसल्याने विद्यार्थी आणखीच संतापले आहेत. चंद्रपूर सह संबंध महाराष्ट्र मध्ये हा गोंधळ सुरू असतानाच आता विधानसभेत आमदार किशोर जोरगेवार यांनी या भरतीत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला आहे. एकूण ३५८ पदांसाठी ही भरती सुरू आहे. बँकेच्या वर्तुळातून काही दलालांनी तीन ते चार दिवसांपासून उमेदवारांना फोन करून पैश्याची मागणी केली आहे. संबंधित दलाल एका जागेसाठी ४० लाख रुपये मागत असल्याचा आरोप जोरगेवारांनी केला आहे. आमदार जोरगेवार यांनी औचित्याच्या विषयामध्ये हा मुद्दा उपस्थित करत विधानसभा अध्यक्षांना ही बाब निदर्शनास आणून दिली. तसेच या परीक्षा प्रक्रियेत मोठा घोळ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून ३१ हजार १५६ उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज आले आहेत. ही परीक्षा राज्यातील नऊ जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर सुरू आहे. दरम्यान चंद्रपूर जिल्हा बँकेची परीक्षा चंद्रपूर जिल्ह्यात घेण्यात यावी, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नांदेड व जालना जिल्ह्यांचा काय संबंध असा प्रश्न आमदार जोरगेवार यांनी उपस्थित केला आहेत. परीक्षेत झालेल्या बिघाडा संदर्भात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याणकर यांच्याशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता थोड्या वेळात फोन करतो असे सांगून त्यांनी उत्तर देण्यास टाळले व त्यानंतर केलेल्या फोनला त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
Comment List