नवरात्रोत्सव विशेष : संघर्षमय जीवनात वाटचाल करणारा प्रवास..!
सौ.भारती गवळी यांची नवरात्रोत्सवाची सातवी माळ
आधुनिक केसरी न्यूज
लेखिका : किशोरी शंकर पाटील
सौ.भारती महादेव गवळी, सांगली नवरात्रोत्सवाची सातवी माळ घरात शैक्षणिक वातावरण नसताना आणि अर्थिक परिस्थिती बेताची तरीही शिकण्याची तळमळ आणि आवड असल्यामुळे घरातील गुरांना पाणी देणे,बैलगाडीतील चारा गोठ्यात आणून ठेवणे. शेणी थापणे, गोठा साफ करणे, आईला घरकामात मदत हे सर्व करून त्यातूनच अभ्यासाला वेळ काढायचा अशाप्रकारे मॅट्रीक उत्तीर्ण झाली. जिद्दीने १२वी काॅमर्सची ही परिक्षा उत्तीर्ण झाली. मधल्या काळात टायपिंग आणि शिवणक्लास पण केला. नंतर मिरजेवरून लग्न होऊन सांगलीत आले. एकत्र कुटुंबात पुन्हा शिकायचे झाले तर ईच्छा असून शिक्षण घेता आले नाही. पहिला मुलगा सुशांत नंतर दोन वर्षांनी मुलगी संपदा झाली.मुलं लहान होती. तेव्हा मिस्टरांना मानसिक त्रास आणि शुगरचा सुरू झाला. वारंवार तो आजार उफाळून यायचा अॅडमीट करावे लागायचे. त्यावेळीचे प्रसंग आठवले तरी अंगावर काटा येतो. एक खूप चांगले डाॅक्टर भेटले त्यांनी अतिशय चांगला उपचार केला अजून पर्यंत काही तब्येतीची तक्रार नाही. नशीब आमचे थोर असे चांगले डाॅक्टर भेटले.
मुलं थोडी मोठी झाल्यावर माझे अकाऊंट चांगले होते. बहिणीची ओळख होती बँकेत नोकरीसाठी एक जागा होती. इंटरव्हयू दिला त्यांनी लगेच कामावर यायला सांगितले. पगार अगदी कमी होता. कारण बँक तितकीशी मोठी नव्हती. बँक गावांतच होती आणि बँक सहकारी खूप छान होते. खेळीमेळीचे वातावरण असे. आमच्या सर्वांच्या प्रयत्नांने बँकेला उर्जित अवस्था प्राप्त झाली.
बँकेत नोकरीला होते तेव्हाही मिस्टरांचा तब्येतीच्या तक्रारी चालू असायच्या घरातील जबाबदाऱ्या आणि मुलांचे संगोपन त्यांचे शिक्षण शाळा अभ्यास खूपच ओढाताण व्हायची. दरम्यान दोन चार वर्षापूर्वी मुलाचा खूप मोठा अपघात झाला. त्यामुळे नोकरी सोडावी लागली. तेही दिवस निघून गेले. अडचणीच्या वेळी आपलेच हितचिंतक धावून येतात. बऱ्या वाईट अनुभवातून जावे लागले आता मुलाने शिकून तो त्याचा व्यवसाय संभाळत आहे. मुलगी एम ए बीएड शिक्षण घेतले. दोघांची लग्न झाली आहेत. एक गोंडस नात आहे. संसारात संकटे किती ही आली तरीही खंबीरपणे तोंड दिले. मिस्टरांच्या आजारपणात भावाने खूपच मदत केली. आम्ही भावंडे आतापर्यंत आजारपण असो किंवा काही अडचणी एकमेकांसाठी धावून आलो आहोत. वडील एकटेच मामा व आत्याही नाही. आम्ही भावंडेच एकमेकांचे आधार. आम्ही भावंडे आईवडीलानी दिलेले संस्कार,प्रामाणिकपणाची शिकवण या मार्गावर चालत आहोत आणि समाधानाने जगत आहोत.
Comment List