साहित्य क्षेत्रात साथ देणारी माऊली...
श्रीमती रंजनाताई शर्मा यांच्यासाठी नवरात्रीची पहिली माळ
आधुनिक केसरी न्यूज
सौ.किशोरी शंकर पाटील
बेलवंडी गावातील ता -श्रीगोंदा,जिल्हा -अहमदनगर रंजनाताई शर्मा आणि अशोक शर्मा मायलेक आईने आपल्या मुलांसाठी केलेल्या समर्पणाचे इतिहासात अनेक दाखले आहेत आणि याला या काळात सुध्दा अपवाद नाही अशीच ही दोघांची कहाणी आहे. नाशिक साहित्य संमेलनात अशोक शर्मा यांची भेट झाली. त्यांनी बेलवंडीला साहित्य संमेलनाला येण्याचे आमंत्रण दिले तेव्हा गेल्या वर्षी निमंत्रित कवी म्हणून संमेलनासाठी हजेरी लावली. तेव्हा त्यांच्या विषयी सर्व माहिती कळली. रंजनाताईनी आपला संघर्षमय जीवन वृत्तांत सांगितला लहानशी पानटपरी चालवणाऱ्या अशोकचे गावात साहित्य संमेलन भरवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी ही माऊली त्याच्या पाठी खंबीरपणे उभी राहिली.प्रचंड कष्ट करत तिने पैसे उभारले.या बळावर अशोक शर्मा बेलवंडीमध्ये गेली १९वर्ष एक दिवसीय साहित्य संमेलन भरवत आहेत.स्वतःच्या मोडक्या घरासाठी एक पैसाही खर्च न करता सुरू असलेला त्यांचा हा एकप्रकारे साहित्ययज्ञ होता.
अशोक शर्मा कवितेच्या आवडीने तरुण वयात विविध कवी संमेलनातून फिरले.तेव्हाच हा विचार मनात रूंजी घालत होता. तो सत्यात उतरवण्यासाठी आईने घेतलेले अपार कष्ट त्यांनी सांगितले तेव्हा डोळ्यात पाणी तरळलं.घरात सुरू केलेल्या खाणावळीसाठी दिवसाला हजार पोळ्या लाटणं,उदबत्त्या वळणं,लोकरीचे रुमाल विणणं,स्त्रियांना शिवणकाम शिकवणं असे नाना उद्योग करून वर्षभरात पन्नास ते साठ हजार जमवून, त्या ते सर्व पैसे साहित्य संमेलनासाठी अशोकच्या स्वाधीन करत. गेल्या वर्षी कवी. प्रवीण दवणे, साहित्यिक लेखक भारत सासणे तर
या संमेलनाला या अगोदर डॉ श्रीराम लागू,निळू फुले,सदाशिव अमरापूरकर,आशा काळे,साहित्यिक आनंद यादव,सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार असे अनेक मान्यवर येऊन गेलेत.हे कसं जमवलं या प्रश्नाचे उत्तर देताना अशोकजींनी सांगितलं की सार्वजनिक बुथवरून एक रुपयाचे नाणे टाकून केलेला फोन व पाठोपाठ पाठवलेले २५ पैशांचे पोस्टकार्ड.. मनाचा प्रामाणिकपणा आणि कामाप्रती आस समोरच्यापर्यंत पोहचली तर अशक्य ते शक्य कसं घडू शकतं.
या १९ वर्षांच्या वाटचालीत परीक्षा पहाणारे अनेक क्षण आले पण आध्यात्मिक ग्रंथांच्या अभ्यासातून मिळालेल्या सामर्थ्याने रंजनाताईंनी त्यातून सहजी मार्ग काढल्याचे काही दाखले त्यांनी सांगितले. या संमेलनामुळे त्या पंचक्रोशीतील गावांतून रुजू लागलेली साहित्यसंस्कृती आणि या अनोख्या साहित्य सेवेमुळे मिळालेले अनेक पुरस्कार व पत्रव्यवहार जागेअभावी गोणीत ठेवावे लागले आहेत हे प्रत्यक्ष पाहिले आहे.साहित्य सेवेसाठी आयुष्य वेचलेल्या या मायलेकाच्या डोक्यावरील छप्पर नीट व्हावं,त्यांच्या या विलक्षण साहित्य सेवेवरील प्रेम पाहून अनेक साहित्यातील दानशूर व्यक्तींनी रंजनाताईंना घरबांधणीसाठी मदतीचा हात पुढे केला त्यात माझा सहभाग असल्याचे समाधान मिळाले. साहित्य वेड्या मायलेकांच्या परिश्रमांची ही पावतीच म्हणावी लागेल.
Comment List