पाऊस असलेल्या ठिकाणची पोलीस भरती पुढे ढकलली  ; खा. लंके यांच्या मागणीस देेवेंद्र फडणवीसांचा सकारात्मक प्रतिसाद 

पाऊस असलेल्या ठिकाणची पोलीस भरती पुढे ढकलली  ; खा. लंके यांच्या मागणीस देेवेंद्र फडणवीसांचा सकारात्मक प्रतिसाद 

आधुनिक केसरी न्यूज 
 
श्रीकांत चौरे
 
नगर : ऐन पावसाळयाच्या तोंडावर पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने या प्रक्रीयेत सहभागी होउ इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मागणीची दखल घेउन भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याच्या खासदार नीलेश लंके यांच्या मागणीस राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ज्या भागात पाउस आले त्या भागातील भरती प्रक्रीया पुढे ढकलण्याचा निर्णय गृह विभागामार्फत घेण्यात आला आहे. 
      अमरावती, सोलापूर, नांदेड येथे पाऊस असल्याने तेथील भरती प्रक्रिया स्थगित करण्यात येउन ही  प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांना पुढील तारखा देण्यात आल्याचे खा. नीलेश लंके यांच्या संपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले. 
        पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी भरती प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी खा. नीलेश लंके यांची भेट घेऊन पावसाळयाच्या तोंडावर घेण्यात येत असलेली  ही चाचणी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. उमेदवारांच्या मागणीची दाखल घेत खा. नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेे तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार करून या उमेदवारांच्या मागणीची दखल घेउन मैदानी चाचणी पुढे ढकलण्याची  मागणी केली होती. 
     राज्यात पावसाचे वातावरण असल्याने, तसेच पाऊस झाल्याने पोलीस भरतीमधील मैदानी चाचणीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. मागील आठवडयापासून अनेक ठिकाणी पाउस पडत असल्याने भरती प्रक्रियेसाठी मैदानी तयारी करणाऱ्या उमेदवारांना सराव करता आलेला नाही. बहुतांश उमेदवारांनी मोकळया मैदानावर सराव केलेला असून पावसामुळे चिखल झालेल्या मैदानावर चाचणी देणे त्यांना कठीण जाणार आहे. पावसात व चिखलात मैदानी चाचणी देणे धोक्याचे असून त्यामुळे उमेदवारांना दुखापत होउ शकते. 
      मैदानी चाचणीच्या दिवशी अचानक पाऊस आल्याने भरती प्रक्रिया प्रभावित होऊन त्याचा परिणाम वर्षानुवर्षे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणार असल्याची भिती खा. लंके यांनी या पत्रात व्यक्त केली होती. या मागणीची दखल घेत पाऊस असलेल्या ठिकाणची भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय राज्याच्या गृहमंत्र्यांनी घेतला आहे.
Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List