नवनिर्वाचित खासदार सुनिल तटकरेंचा खळबळजनक आरोप : धार्मिक ध्रुवीकरण करत ...

नवनिर्वाचित खासदार सुनिल तटकरेंचा खळबळजनक आरोप :  धार्मिक ध्रुवीकरण करत ...

आधुनिक केसरी न्यूज 

दापोली : धार्मिक ध्रुवीकरण करत यावेळी निवडणूका लढल्या गेल्या आणि त्याचा अनुभव देशाने घेतला. अल्पसंख्याक, दलित, आदिवासी हे समाजघटक विरोधात गेलेले असतानाही महायुतीचे कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यामुळेच ८२ हजाराचे मताधिक्य मिळाले हे माझ्या कामाचे फलित आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी दापोली येथील आभार सभेत कृतज्ञता व्यक्त केली. 

लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळाले असले तरी काही मतदारसंघात आघाडी कमी मिळाली आहे मात्र याची जी कारणे आहेत त्याचा विचार करुन पूर्ण क्षमतेने विधानसभा निवडणुकीत उतरायचे आहे असे आवाहन खासदार सुनिल तटकरे यांनी केले. 

आपले उद्दिष्ट फक्त विधानसभा निवडणूक असता कामा नये तर आपल्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या पदावर बसवत नाही तोपर्यंत काम थांबवायचे नाही असेही सूतोवाच सुनिल तटकरे यांनी केले. 

सर्वंकष नेत्यांचे पाठबळ या रायगड लोकसभा मतदारसंघात मला जसे लाभले तसे सर्वाधिक ज्या महिला मतदारांनी माझ्या विजयात तितकाच मोलाचा वाटा उचलला आहे त्यामुळेच घासून नाही तर ठासून निवडून आलो असे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. 

कमी मताधिक्य जरी मिळाले असले तरी या मतदारसंघात काकणभर सरस काम केले जाईल असा शब्द सुनिल तटकरे यांनी यावेळी दिला. 

जे समाजघटक या लोकसभा निवडणुकीत आपल्यापासून दूर गेले आहेत त्यांना आपल्याकडे नक्कीच आणण्याचा प्रयत्न करु आणि येणाऱ्या आव्हानाला ताकदीने सामोरे जाऊ असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. 

मी या मतदारसंघात जो शब्द दिला आहे तो शब्द नक्की पाळणार आहे. एकवेळ श्रीवर्धन मागे राहिल परंतु दापोलीला झुकते माप दिले जाईल. सर्व प्रश्न सोडवले जातील. मी महायुतीचा खासदार तुमच्या हक्काचा आहे असेही सुनिल तटकरे यांनी आवर्जून सांगितले. 

हिम्मत हारलेले आपण कार्यकर्ते नाहीत. पुन्हा एकदा जोमाने या मतदारसंघात आपली ताकद दाखवून देऊ. समाजातील जे काही घटक दुरावले आहेत. ते परत कसे जोडले जातील. त्या घटकांनी लोकसभा निवडणुकीत झाले गेले विसरुन आम्ही जी सामाजिक समानता ठेवून काम करत आलो आहोत तीच समानता ठेवून काम करण्यासाठी त्यांचा हातभार घेऊ असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट शब्दात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. 

ज्या मतावर यांना सुज आली त्या मुस्लिम समाजाचे आभार मानायलासुध्दा हे लोक आले नाहीत. हे दुर्दैव आहे अशा शब्दात उदय सामंत यांनी विरोधकांना फटकारले. 

खोटी गोष्ट कशी रुजवली गेली हे आपण या निवडणुकीत पाहिले आहे. गैरसमजातून मुस्लिम समाज लोकसभेत मतदानाला उतरला मात्र आता त्यांच्या ही चूक लक्षात आली आहे आता ते विधानसभेला पाठीशी उभे राहतील असा विश्वास त्यांनी दिला आहे असे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. 

महाविकास आघाडीचे किती खासदार निवडून आले हे महत्वाचे नाही मात्र जे महायुतीचे खासदार निवडून आले आहेत त्यांच्यासाठी खासदार सुनिल तटकरे यांचे मार्गदर्शन ठेवले पाहिजे अशी मागणी उदय सामंत यांनी यावेळी केली. 

हे महायुतीचेच कोकण आहे हा संदेश कोकणी जनतेने कोकणातून देशाला दिला आहे.  जे उबाठा गटाचे लोक भासवत होते की कोकण आमचेच आहे त्यांना कोकणातील लोकांनी सडेतोड उत्तर दिले आहे अशा शब्दात आमदार योगेश कदम यांनी उबाठा गटावर जोरदार टिका केली. 

केंद्राच्या वेगवेगळ्या योजना दापोली मतदारसंघात खासदार झाल्यानंतर तुमच्यारुपाने येतील अशी आशा योगेश कदम यांनी व्यक्त केली. 

अनंत गीते कधीही खासदार झाल्यावर आभार मानायला आले नाहीत मात्र खासदार सुनिल तटकरे हे जनतेचे आभार मानायला आले आहेत हीच मोठी गोष्ट आपल्यासाठी आहे असेही आमदार योगेश कदम म्हणाले. आभार सभेचे प्रास्ताविक भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी केले. 

आभार दौऱ्याची शेवटची सभा दापोली शहरात आज पार पडली.  त्यापूर्वी खेड शहरात आगमन होतानाच सुनिल तटकरे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. भरणेनाका येथील काळकाई देवीचे दर्शन यावेळी सुनिल तटकरे यांनी घेतले. 

दापोली शहरात आगमन होताच खासदार सुनिल तटकरे यांचे फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताशांच्या गजरात महायुतीच्यावतीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत, दापोलीचे आमदार योगेश कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रितम रुके, शिवसेनेचे उन्मेष राजे, अजय बिरवटकर आदींसह महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List