मोठी बातमी : अटल सेतुचे काम निकृष्ट दर्जाचे, तीन महिन्यातच रस्त्याला भेगा, रस्ता एक फुट खचला

महायुती सरकारच्या भ्रष्टाचारावर पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार : नाना पटोले

मोठी बातमी : अटल सेतुचे काम निकृष्ट दर्जाचे, तीन महिन्यातच रस्त्याला भेगा, रस्ता एक फुट खचला

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या अटल सेतुचे उद्घाटन करण्यात आले त्या रस्त्याला अवघ्या तीन महिन्यातच भेगा पडल्या आहेत. नवी मुंबईकडील एका भागात अर्धा किलोमीटरपर्यंत रस्ता एक फुट खाली खचला आहे. महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. कर्नाटकातील आधीचे भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले होते पण महायुती सरकार तर १०० टक्के कमीशनखोर आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर अटल सेतुची पाहणी करून रस्त्याला भेगा पडल्याचे निदर्शनास आणून दिले. शिवडी न्हावा शेवा प्रकल्पावर राज्य सरकारने १८ हजार कोटी रुपये खर्च केला असून यासाठी बँकेकडून कर्ज काढले आहे. हा काही विकास नाही तर भ्रष्टाचार असून सरकार स्वतःची घरे भरत आहे आणि जनतेच्या जीवाशी खेळत आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव या प्रकल्पाला दिले आहे, त्यांच्या नावाने भ्रष्टाचार करणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले, उद्घाटनाआधी त्यांनी या प्रकल्पाची व्यवस्थित पाहणी तरी करायला हवी होती. पण नरेंद्र मोदी हेच देशातील भ्रष्टाचाराचे सरदार आहे. सर्व भ्रष्टाचाऱ्यांना ईडी, सीबीआयचा धाक दाखवून भाजपात घेऊन मंत्री बनवतात.  
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात खारफुटीची कत्तल करण्यात आली आहे, एक टेकडीही फोडली असून पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे. वसईच्या खाडीत पाईप लाईनचे काम सुरु असताना एक गरिब कामगार २० मीटर खाली दबला गेला, त्याच्यावर हजारो किलो लोखंड पडले. मा. उच्च न्यायालयाने या सर्व घटनांमध्ये स्वतः लक्ष घालावे असे म्हणत हे सर्व प्रकार मुख्यमंत्री शिंदे यांच्याच खात्यात होत आहेत. सरकारला याचे उत्तर द्यावे लागेल काँग्रेस पक्ष या भ्रष्टाचारी सरकारला अधिवेशनात जाब विचारेल, असेही नाना पटोले म्हणाले.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List