झाडीपट्टीचे 'गद्दार' नाटक पोहचले महाराष्ट्रभर..!
आधुनिक केसरी न्यूज
मूल : झाडीपट्टी रंगभूमी ही व्यावसायिकदृष्ट्या श्रीमंत असली तरी या रंगभूमीचे प्रयोग झाडीपट्टीबाहेर अपवादानेच होतात. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रातील रसिकांना या रंगभूमीबद्दल कमालीची उत्सुकता असते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यावर्षी शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने झाडीपट्टी रंगभूमीवरील 'गद्दार' या गाजलेल्या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रभर विविध शहरात सादर करून रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळविला.
या रंगभूमीचे प्रयोग चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा , गोंदिया हे जिल्हे व त्याभोवतीच्या सीमावर्ती भागात बहुतांशी होतात. त्यामुळे येथील कलावंतांना या परिघाच्या सीमा ओलांडण्याची संधी फारशी मिळत नाही. पण नाट्य परिषदेच्या सहयोगाने हा योग जुळून आला असून आनंद भिमटे लिखित 'गद्दार' नाटकाचे दहा निशुल्क प्रयोग महाराष्ट्रभर झाले. डॉ. नरेश गडेकर दिग्दर्शित या नाटकाचे यापूर्वी झाडीपट्टीत शेकडो प्रयोग झाले आहेत. झाडीपट्टीत काही काळ हौसेखातर सुपरस्टार मकरंद अनासपुरे यांनीही यात विनोदी भूमिका केली आहे. यावेळच्या महाराष्ट्र दौऱ्यात झाडीपट्टीचे प्रसिद्ध डॉ. नरेश गडेकर, देवेंद्र दोडके, अरविंद झाडे, आसावरी तिडके, देवेंद्र लूटे या झाडीपट्टीतील नामवंत कलाकारांसह शुभम मसराम, निशांत अजबेले, अमोल देउलवार, करिष्मा मेश्राम, सुनैना खोब्रागडे, पौर्णिमा तायडे, व बालकलाकार गंधर्व गडेकर यांनी आपल्या अभिनयाची चुणूक साऱ्या महाराष्ट्राला दाखवली.
अमरावती येथून १६ ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या या महोत्सवाची २५ आक्टोबर ला अहिल्यानगर (अहमदनगर) येथे सांगता झाली. दरम्यान कारंजा, अकोला, बीड, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक अशा विविध शहरातील नामवंत नाट्यगृहात या नाटकाचे प्रयोग झाल्याने या रंगभूमीचे वेगळेपण व वैशिष्ट्ये अवघ्या महाराष्ट्राने अनुभवले.
"शंभराव्या मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी रंगभूमीचे विविध प्रवाह महाराष्ट्रातील सामान्य रसिक व समीक्षकांपर्यंत पोहचावे हा परिषदेचा उद्देश आहे. 'गद्दार' च्या निमित्ताने झाडीच्या कलावंतांना ही संधी मिळाली आहे. या रंगभूमीच्या उत्थानासाठी यापुढेही असे अनेक उपक्रम घेण्याचा मानस आहे."
डॉ. नरेश गडेकर
उपाध्यक्ष,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
"आद्य नाटककार भवभूती चा पारंपरिक वारसा सांगणारी ही रंगभूमी आहे. ही रंगभूमी समृद्ध असली तरी झाडीपट्टीच्या सीमापार प्रयोग करण्याचे योजनाबद्ध प्रयत्न पहिल्यांदाच झाले आहेत. डॉ. नरेश गडेकर यांच्या निमित्ताने या रंगभूमीच्या 'हक्काचा माणूस' नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या या अभियानाचे कौतुकच केले पाहिजे.
किशोर उरकुंडवार नाट्यरसिक
Comment List