वाद पेटला ! ...तर भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादीसोबत युती केलीच नसती
आधुनिक केसरी न्यूज
मुंबई : ज्याठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आहे त्याठिकाणी भाजपला फायदा झाला आहे तर ज्याठिकाणी राष्ट्रवादीची ताकद नाही तिथे भाजपला फटका बसला हे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे मात्र राष्ट्रवादीमुळे भाजपला नुकसान झालेले नाही. जर असे असते तर भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांनी राष्ट्रवादीसोबत युती केली नसती अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी स्पष्ट केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'विवेक' साप्ताहिकात राष्ट्रवादीसोबत युती झाल्याने भाजपचे नुकसान झाले असे प्रसिद्ध झाले आहे त्यावर उमेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडली आहे.
याअगोदर ऑर्गनायझरमध्येही अशाच प्रकारचे वक्तव्य करण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर मतदारसंघनिहाय पूर्ण आकडेवारी उपलब्ध आहे. त्यामध्ये संबंध महाराष्ट्रात ज्या - ज्याठिकाणी भाजपचे खासदार निवडून आलेत त्याभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावक्षेत्रातून चांगल्या प्रकारे मतदान झालेले आहे. ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला त्या भागात राष्ट्रवादीची ताकद मर्यादित होती.विशेष म्हणजे विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मर्यादित आहे. त्यामुळे मतदानाची आकडेवारी स्पष्ट करते की राष्ट्रवादीमुळे भाजपचा पराभव झालेला नाही किंवा सिध्दही झालेले नाही असेही उमेश पाटील म्हणाले.
मतांच्या ट्रान्स्फरबाबत बोलले जात आहे मात्र ही नजीकच्या काळातील महायुती आहे. भविष्यात या महायुतीत सुधारणा होत जाणार आहे. राष्ट्रवादीचा भाजपला आणि भाजपचा राष्ट्रवादीला उपयोग होणार आहे. त्यामुळे मते ट्रान्स्फर व्हायला वेळ लागतो. व्यक्तिगत स्वरुपात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात मते मांडली जात असतील तर ते मत भाजपच्या वरीष्ठ नेत्यांचे किंवा भाजपचे मत असू शकत नाही. आजपर्यंत भाजपच्या निर्णय प्रक्रियेत असणार्या कुठल्याही नेत्याने किंवा पक्षाच्यावतीने अशापध्दतीने राष्ट्रवादीमुळे भाजपचे नुकसान झाले आहे असे म्हटलेले नाही याची आठवणही उमेश पाटील यांनी करुन दिली.
Comment List