भारतीय अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी ठोस निर्णयांचा अर्थसंकल्प :आ.किशोर जोरगेवार
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : केंद्रीय अर्थसंकल्प 2025 हा आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक विकासावर भर देणारा आहे. मध्यमवर्गीय नागरिक, शेतकरी, उद्योजक आणि तरुणांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनांचा यात समावेश असून भारतीय अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी ठोस निर्णयांचा हा अर्थसंकल्प असल्याचे प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.
गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल, असे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून, धनधान्य योजना सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. तसेच, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. कृषी क्षेत्रासाठी दिलेल्या विशेष तरतुदींमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि आधुनिक शेतीला चालना मिळेल. त्याचप्रमाणे, पायाभूत सुविधा, उद्योग आणि उत्पादन क्षेत्रासाठी भरीव तरतुदी केल्यामुळे नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. मध्यमवर्गीयांसाठी करसवलतींची तरतूद ही जनसामान्यांना मोठा दिलासा देणारी आहे. तसेच, नवीन स्टार्टअपसाठी भांडवली गुंतवणुकीला चालना देणाऱ्या योजनांमुळे युवकांना नवीन संधी उपलब्ध होतील.
शहरी कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. उत्पादन क्षेत्रात अधिकाधिक युवकांना संधी मिळावी यासाठी त्यांच्या कौशल्य विकासावर भर दिला जाणार आहे. तसेच, पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम केले जाणार असून, ५० नवी पर्यटन स्थळे विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. महत्त्वाच्या ३६ औषधांवरील कस्टम ड्युटी हटविण्यात आल्याने औषधे स्वस्त होतील, ज्याचा थेट फायदा सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे. एकंदरीत, हा अर्थसंकल्प आर्थिक स्थैर्य, गुंतवणूक वाढ, रोजगारनिर्मिती आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देणारा असून, भारतीय अर्थव्यवस्थेला बळकट करणारा आहे. देशाच्या प्रगतीसाठी हा संकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरेल, अशी प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.
Comment List