गोठ्याला आग लागून तीन लाखांचे नुकसान; खडकी सदार येथील घटना
रिसोड: तालुक्यातील खडकी सदार येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागून जवळपास तीन लाखांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची घटना 29 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. यामध्ये एक शेळी दगावली असून शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.
खडकी सदार येथे बुधवार रात्री 10.30 वाजताच्या सुमारास गोठ्याला अचानक आग लागल्यामुळे शेतकऱ्यांचे जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गजानन ज्ञानबा धांडे यांच्या गट क्रमांक 304 मध्ये शेतात गोठा आहे. बुधवारी रात्री गजानन धांडे हे झोपले असताना आपल्या शेजारी कंदील पडून गोठ्याला अचानक आग लागली. आगीची तीव्रता मोठी होती. त्यामध्ये १५ हजार रुपये किंमतीची शेळी दगावली.
तसेच त्यांच्या सुद्धा हाताला चटके बसले व यामध्ये दोन पोते गहु, सोयाबिन पाच क्विंटल, तीन क्विंटल तूरी मोटार पंप, फवारणी पंप तसेच वीस हजार रोख रक्कमा जळून खाक झाली, असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्याने संबंधित तलाठ्याला संपर्क करून घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेचा पंचनामा करून शेतकऱ्याला आर्थिक मदतीची मागणी होत आहे.
Comment List