संविधान घ्या - संविधान द्या उपक्रम हळदी कुंकू समारंभात संविधानाचा जागर..!
आधुनिक केसरी न्यूज
पुणे : भिडेवाडाकार फुलेप्रेमी संविधान दूत विजय वडवेराव यांनी भारतीय संविधानाबाबत जागृती व्हावी, संविधानाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी मकरसंक्राती दिवशीच हळदी कुंकू समारंभाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या स्त्रीयांनी तिळगुळा सोबतच संविधान दूत बनून संविधानातील विचारांची देवाण घेवाण करावी, संविधाना विषयी सामान्य नागरिकांत जागृती करावी, संविधानाचा प्रचार प्रसार करावा, संविधानाची ओळख करून द्यावी व संविधानाने आपल्याला दिलेले हक्क अधिकार, आपली कर्तव्ये नागरिकांना समजावीत म्हणून मकर संक्रांत ते रथसप्तमी पर्यंत होणाऱ्या हळदी कुंकू समारंभात तिळगुळ देण्या घेण्या सोबतच संविधानातील विचारांचीही देवाण घेवाण करावी यासाठी मकरसंक्रांत - हळदी कुंकू समारंभ स्पेशल संविधान द्या संविधान घ्या या आगळया वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले होते त्याला महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.विजय वडवेरावांनी आयोजित केलेल्या आंतर राष्ट्रीय फुले फेस्टिव्हलमध्ये आलेल्या फुलेप्रेमी कवींना सहाशे पेक्षा संविधान ग्रंथ वितरित केले होते. या सर्व फुले प्रेमी कवयित्रिंनी संविधान दूत बनून हळदी कुंकू समारंभात संविधानाचा जागर करावा असे आवाहन विजय वडवेराव यांनी केले होते. या आवाहनाला महाराष्ट्र भरातून प्रतिसाद देत घरगुती हळदी कुंकु समारंभ, शाळा, महाविद्यालये, मंदिरे, जेष्ठ नागरिक संघ,
विरंगुळा केंद्र, योगा क्लब, हास्य क्लब, मॉर्निंग वॉक ग्रुप, ट्रेकिंग ग्रुप, भजनी मंडळे, सार्वजनिक वाचनालये, ग्रंथालये या सर्व ठिकाणी स्त्रीयांनी मोठया प्रमाणात हळदीकुंकू समारंभात संविधान द्या संविधान घ्या या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व संविधानाचा जागर केला.माझे संविधान - माझी जबाबदारी आहे. जर संविधानामुळे आपले स्वातंत्र्य अबाधित आहे, आपले हक्क अधिकार शाबूत आहेत तर संविधानाचे जतन आणि संरक्षण करणे ही नागरिक म्हणून आपलीही जबाबदारी आहे कर्तव्य आहे असे आवाहन विजय वडवेराव यांनी केले होते. हळदी कुंकू समारंभात इतक्या मोठया प्रमाणात संविधानाचा जागर होणे ही बहुधा देशातील पहिलीच घटना असावी.
Comment List