पर्यावरण संवर्धन व संरक्षणाच्या 10 संकल्पासह आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
पर्यावरणाच्या युद्धात सगळे सोबत मिळून कार्य करू : सुधीर मुनगंटीवार
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर माणसानेच सगळ्यात जास्त नुकसान या पर्यावरणाला व निसर्गाला पोहोचवले आहे. त्यामुळे पर्यावरणात आणि एकूणच वातावरणात सुधारणा करायची असेल तर ही सुरुवात स्वतःपासून करा. पुढच्या पिढीसाठी काही करायचं आहे असं म्हणण्यापेक्षा आजच याच जन्मामध्ये आपण या पृथ्वीसाठी, या पृथ्वीवरील वातावरणासाठी, निसर्गासाठी काय करू शकतो याचा विचार करा असा संदेश देत पर्यावरणाच्या युद्धात आपण सगळेजण मिळून काम करू असे आश्वासन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी दिले.
एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबईच्या वतीने वातावरण बदलावर अध्ययनासाठी तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन चंद्रपूर येथे करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह एस एन डी टी च्या कुलगुरू उज्वला चक्रदेव, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, मनपा आयुक्त मंगेश खवले, आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलत असताना आज या देशांमध्ये पाणी विकत घ्यावा लागत आहे उद्या याच देशांमध्ये हवा ही विकत घ्यावी लागेल. अशी वेळ आपल्यावर येऊ नये असं वाटत असल्यास आपणच या वातावरण बदलाच्या अनुषंगाने काहीतरी कृती करावी, तसा विचार करणे हे आज गरजेचे झालेले आहे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार याप्रमाणे आपणच आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी शिल्पकार म्हणून काम करूया. 2070 पर्यंत हा देश कार्बन न्युट्रल देश करायचा आहे. हे मोदीजींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या दिशेने करावयाच्या कार्याची सुरुवात चंद्रपुरातील आंतरराष्ट्रीय परिषदेपासून होईल तसा संकल्प आपण या ठिकाणी करूया. यासाठी एसएनडीटीच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहकार्याने पर्यावरणाच्या युद्धात आपण सगळे मिळून काम करू. सुरज ना बन पाये तो दीपक बनके जलता चल याप्रमाणे आपलं योगदान या क्षेत्रात देण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केल्यास या परिषदेचा खऱ्या अर्थाने उद्देश्य साध्य झाला असे म्हणता येईल असे मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना कुलगुरू उज्वला चक्रदेव यांनी वातावरण बदलल्यावर अध्ययन करण्यासाठी आयोजित केलेल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी चंद्रपूर मधील वन अकादमीची केलेली निवड अतिशय सार्थ आहे. इथल्या वातावरणाने आणि इथल्या एकूणच परिसरात वातावरणाचा मनावर आणि विचारांवर होणारा परिणाम आम्ही सगळ्यांनीच इथे अनुभवलेला आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांचा मिळालेले सहकार्य हे शब्दांच्या पलीकडे आहे असं म्हणत त्यांनी चंद्रपूरकरांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी आमदार मुनगंटीवार यांनी केलेले सहकार्य, त्यांचे मिळालेले मार्गदर्शन आणि उद्घाटन आणि समारोप कार्यक्रमासाठी त्यांनी दिलेली उपस्थिती ही आम्हा सगळ्यांसाठी प्रेरणादायक आहे असे म्हणत त्यांनी आभार मानले. नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चंद्रपूरच्या नवीन उपकेंद्रात सर्वोत्तम पद्धतीने कशा पद्धतीने राबवण्यात येईल याचा प्रामाणिक प्रयत्न एसएनडीटी करणार आहे. औद्योगिक कंपन्यांच्या सोबत सहकार्याचे धोरण ठेवत अनेक आश्वासन त्यांनी या अनुषंगाने आम्हाला दिलेले आहेत. लवकरच पुढील ॲक्शन प्लॅन तयार करून एसएनडीटी या कार्यामध्ये पुढे जाईल एवढेच नव्हे तर एसएनडीटीच्या विद्यार्थिनी आणि एकूणच प्राध्यापक व इतर कर्मचारी वृद्ध यांच्या सहकार्याने चंद्रपूरकरांचेही आपण काही देणं लागतो ते देणं परत करण्याचा संकल्प करण्यासाठी बांबू रोपण करीत चंद्रपूरला सुंदर करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण मिळून करूया असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी आपल्या भाषणादरम्यान उपस्थित सगळ्यांना पर्यावरणाच्या रक्षणाकरिता मी वैयक्तिक पातळीवर माझे पाऊल उचलेल, मी प्लास्टिक शून्य जीवन पद्धतीचा प्रयत्न करेल, माझे घर, ऑफिस, महाविद्यालय यांच्या जवळ असलेल्या झाडांचे जतन आम्ही करणार आहोत, पाण्याचा एक एक थेंब वाचवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू, आमच्या परिसरामध्ये सौरऊर्जेला आम्ही प्राधान्य देऊ, वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही सार्वजनिक वाहनांचा उपयोग करू अशा विविध 10 संकल्प घेत कुलगुरू उज्वला चक्रदेव यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
समारोपीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने पर्यावरण जनजागृती रॅली काढण्यात आली होती त्यात सादर करण्यात आलेल्या विविध देखाव्यांसाठी आणि या परिषदेदरम्यान घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेसाठी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या औचित्याने संचालक डॉक्टर राजेश इंगोले यांनी स्वागत पर भाषण केले. तर प्राध्यापिका जयश्री शिंदे व प्राध्यापक शितोळे यांनीही या परिषदेच्या दरम्यान घेण्यात आलेल्या विविध सत्रांबद्दलची एकूण माहिती व तीन दिवसीय परिषदेचे अहवाल वाचन केले. महाराष्ट्राचे मुख्य सचिव सुजाता शौनिक यांनी यादरम्यान ऑनलाईन सहभागी होत या परिषदेसाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या जीवनात काय बदल घडविता येईल याचा विचार या परिषदेतून व्हावा असे मनोगत सुजाता शौनिक यांनी यावेळी व्यक्त केले.
Comment List