जिल्हाधिकारी दिलीप स्वामी विद्यार्थ्यांचा बालहट्ट पुरवतात तेव्हा…
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजीनगर :-शाळकरी मुलांची सहल आणि त्या लहान बालकांनी हट्ट धरला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना भेटण्याचा. मग काय तर शिक्षकांचाही या बालहट्टापुढे नाईलाज झाला. जिल्हाधिकारी मुलांना भेटले. त्यांच्याशी मनमोकळे बोलून मुले सुखावली. दस्तुरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांशी झालेला हा संवाद या मुलांच्या सहलीचा आनंद शतगुणित करुन गेला.
फुलंब्री तालुक्यातील रेलगाव, सोनारी, वावना येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आज छत्रपती संभाजीनगर येथे आली होती. शहरातील सिद्धार्थ उद्यान, बिबीका मकबरा, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे त्यांनी भेट दिली. सहलीचा मनमुराद आनंद लुटला. येथून जवळच जिल्हाधिकारी कार्यालय आहे म्हटल्यावर मुलांनी जिल्हाधिकारी कार्यालय बघण्याचा आणि खुद्द जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा हट्ट आपल्या शिक्षक शिवनंदा भानुसे, सविता म्हस्के, जयश्री कस्तुरे यांच्याकडे धरला. काही केल्या मुलं ऐकायला तयार नव्हती. शेवटी बालहट्टच तो. शिक्षकांचा नाईलाज झाला.
त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन सामान्य शाखेशी संपर्क साधला. जिल्हाधिकारी कार्यालय बघता येईल असे ठरले, पण जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची व्यस्त कार्यक्रमांमुळे भेट मिळणे अशक्य होते. सकाळी दिशा समिती, जिल्हा विद्युत सल्लागार समिती अशा बैठकांचे सत्र आटोपून जिल्हाधिकारी दुपारी चार वा. जेवणासाठी घरी गेले होते. मुलांचा उत्साह पाहून जिल्हाधिकारी स्वामी यांना कार्यालयातून घरी फोनवर निरोप धाडला. अखेर बालकांचा हा भेटीचा हट्ट जिल्हाधिकाऱ्यांनाही मान्य करावा लागला. दरम्यान मुलांना जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांमध्ये नेऊन तेथील माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी पुन्हा कार्यालयात आले. सर्व मुलांना मग जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात नेण्यात आले. तेथे खुद्द जिल्हाधिकारी आपल्याशी बोलतात हे पाहुन मुले हरखून गेली. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनिय होता, हे सांगणे न लागे. आणि मग जिल्हाधिकाऱ्यांसोबत फोटोही झालाच. हा संस्मरणीय क्षण मुलांना प्रेरणा देत राहण्यासाठी.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी दशसूत्री कार्यक्रम देऊन मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व संस्कारीत मुले घडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांची ही तळमळ या विद्यार्थी भेटीतूनही दिसून आली.
Comment List