गोंडवाना विद्यापीठाचा भोंगळ कारभार विद्यार्थी त्रस्त पेपर रद्द..!
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाद्वारे हिवाळी 2024 च्या परीक्षा सुरू आहेत. डिजिटल युनिव्हर्सिटी म्हणून सर्वत्र मिरवणाऱ्या गोंडवाना विद्यापीठाच्या हिवाळी 2024 च्या परीक्षेदरम्यान आज गोंडवाना विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलेला आहे. गोडवाना विद्यापीठाद्वारे डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयामध्ये बी.एस.सी. आय.टी. प्रथम वर्ष, बी.एफ.डी., एम.कॉम. बी.लीप. या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा येथे घेण्यात येणार आहेत. आज सकाळी साडेनऊ वाजता इथे दिलेल्या टाईम टेबल नुसार पेपर सोडवायला अनेक विद्यार्थी तयारीनिशी आलेले होते. परंतु इथे आल्यानंतर साडेनऊ वाजता पेपर सुरू झाला नाही. त्यामुळे गोंधळलेल्या विद्यार्थ्यांना पेपर उशिरा सुरू होईल असे सांगण्यात आले होते. साडेनऊ चे साडेदहा झाले, साडे अकरा झाले, साडेबारा झाले परंतु पेपर सुरू होईना त्यामुळे विद्यार्थी त्रस्त होऊन गेले होते.अशावेळी या परिस्थितीला योग्य परिस्थितीने हाताळण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांनी स्थानिक सौ. लीना किशोर ममिडवार महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कॉमर्स अँड मॅनेजमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉक्टर जयेश चक्रवर्ती यांना या ठिकाणी पाठविण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परंतु विद्यार्थी बराच वेळ झाल्यामुळे त्रस्त झाले होते. त्यांनी डॉक्टर जयेश चक्रवर्ती यांना हा पेपर नंतर घेण्यात यावा असे निवेदन दिले. हे निवेदन डॉक्टर जयेश चक्रवर्ती यांनी कुलगुरू कडे पाठविलेले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे गोंडवाना विद्यापीठाचा एकूणच भोंगळ कारभार समोर आला असून विद्यार्थ्यांना या प्रकारामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.दुसरीकडे सरदार पटेल महाविद्यालय मध्ये आज दुसऱ्या शिफ्ट मध्ये दोन ते पाच या वेळेतील पेपर साठी 623 विद्यार्थ्यांची संख्या होती. तर गोंडवाना विद्यापीठाने दुपारी 12.30 नंतर येथील परीक्षा विभाग प्रमुखांना मेसेज टाकून तब्बल 691 विद्यार्थी वाढले असून त्यांची परीक्षा घेण्यात यावी असा आदेश देण्यात आला. 623 विद्यार्थ्यांकरीता परीक्षेची संपूर्ण तयारी झाली असताना वेळेवर वाढलेल्या 691 विद्यार्थ्यांसह एकूण १३१४ विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याकरिता सरदार पटेल महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर अचानक दबाव आला. या संपूर्ण प्रकाराला प्राचार्य डॉक्टर काटकर अतिशय शांत व संयमतेने समोर जात आहेत. परंतु अचानक वेळेवर आलेल्या या मेसेजमुळे येथे सुद्धा विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. आहे कारण दोन वाजता सुरू होणारा पेपर वेळवर सुरू झालेला नाही. वेळेवर वर्गावर परीक्षा पर्यवेक्षकांची संख्या वाढविणे, विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था करणे, पेपरच्या प्रिंट काढणे, उत्तर पत्रिका वर शिक्के मारून त्या उत्तर पत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे या सर्व गोष्टींना निश्चितच विलंब लागणार आहे यात शंकाच नाही. त्यादृष्टीने प्राचार्य डॉक्टर काटकर व त्यांची संपूर्ण टीम काम करीत आहे. परंतु गोंडवाना विद्यापीठाच्या या अत्यंत भोंगळ कारभारामुळे वर्षभर मेहनत करून रात्र रात्रभर जागून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र नाहक त्रास होतो आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण वाढत असून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे या परिस्थितीवर आता कशी मात करतात? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
Comment List