चंद्रपूर लोकसभा विश्लेषण : सुधीर मुनगंटीवार यांनी फोडला प्रचाराचा नारळ तर धानोरकर वडेट्टीवार वादात देवतळे व बांगडे यांची उडी 

चंद्रपूर लोकसभा विश्लेषण : सुधीर मुनगंटीवार यांनी फोडला प्रचाराचा नारळ तर धानोरकर वडेट्टीवार वादात देवतळे व बांगडे यांची उडी 

आधुनिक केसरी न्यूज 

शाम हेडाऊ 

 चंद्रपूर : 13 मार्च रोजी सुधीर मुनगंटीवार यांची लोकसभेची उमेदवारी जाहीर करून भारतीय जनता पार्टीने पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या दृष्टीने आपले पहिले पाऊल टाकले व काल दिनांक १८  मार्च रोजी सुधीर मुनगंटीवार यांनी स्थानिक गांधी चौक येथे आयोजित आशीर्वचन सभेमध्ये आपल्या प्रचाराचा नारळ फोडला . तर काँग्रेसमध्ये मात्र अजूनही उमेदवार निश्चितीची प्रक्रिया गोंधळात गोंधळ घालणारी ठरलेली आहे .
          चंद्रपूर वणी आर्णी  लोकसभा 2024 च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने उमेदवार निश्चिती व प्रचाराचा नारळ फोडण्यात आघाडी घेतली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर नगरीत प्रथम आगमना प्रित्यर्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने आशीर्वचन सभेचे आयोजन करण्यात आले होते . कार्यकर्त्यांमध्ये असलेला प्रचंड उत्साह , ठिकठिकाणी झालेले भव्य स्वागत आणि या स्वागताला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी विकास कामातूनच जनतेच्या प्रेमाच व्याज फेडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल व राज्याप्रमाणेच केंद्रातील विविध योजनांचा उपयोग आपल्या लोकसभा क्षेत्रातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असा विश्वास देत विविध समाजातील धर्मगुरूंच्या साक्षीने मतपेरणी करण्यास त्यांनी सुरुवात केली . तर दुसरीकडे मात्र काँग्रेस पक्षामध्ये धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्या वादात आता तेली समाजातील विनायक बांगडे आणि प्रकाश देवतळे या दोन नेत्यांनी उडी घेतल्याने दिल्लीतील गोंधळ आणखीन वाढलेला आहे . 
                 दोन दिवसात पक्षाने आपला उमेदवार जाहीर करावा अन्यथा आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल असा विषय घेऊन तेली समाजातील विनायक बांगडे व प्रकाश देवतळे यांनी आपल्या समाज बांधवांची सभा घेत काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे . 2019 मध्ये काँग्रेस पक्षातर्फे तेली समाजातील ज्येष्ठ नेते विनायक बांगडे यांना उमेदवारी निश्चित झालेली होती . परंतु , ऐनवेळी सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी शिवसेनेतून काँग्रेस पक्षात प्रवेश करत काँग्रेसची उमेदवारी मिळवून आपला विजय संपादन केलेला होता . त्यामुळे तेव्हा पासूनच तेली समाज हा काँग्रेस पासून दुखावल्या गेला होता . तेव्हापासून असलेली ही दुखरी नस प्रकाश दळतळे यांच्या नेतृत्वात आता पुन्हा एकदा नव्याने काँग्रेस समोर डोकेदुखी ठरू लागलेली आहे . 
            काँग्रेसच्या नैसर्गिक नियमाप्रमाणे काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार श्रीमती प्रतिभा धानोरकर यांना ही जागा मिळावी यासाठी संपूर्ण काँग्रेस आपल्या पाठीशी उभी करण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे.  शिवानी वडेट्टीवार यांचे नाव पुढे करून वडेट्टीवार यांनी धानोरकरांच्या उमेदवारी मध्ये खीळ टाकली. धानोरकर वडेट्टीवार हा वाद सर्वश्रुत असतानाच उमेदवारीच्या नावामध्ये ओबीसी चेहरा म्हणून  सुभाष धोटे यांचे नाव समोर यायला लागले . सुभाष धोटे यांचे नाव समोर येताच प्रकाश देवतळे यांना तेली बांधवांवर झालेल्या अन्यायाची आठवण झाली . आणि त्यांनी थेट आपल्या समाज बांधवांची सभा घेत या बैठकीमध्ये काँग्रेसने दोन दिवसात उमेदवार जाहीर करावा अथवा आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा काँग्रेसला दिलेला आहे . तर दुसऱ्या बाजूला चंद्रपूर शहर जिल्हा अध्यक्ष रितेश तिवारी यांनी त्यांच्या समाज माध्यमावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आधी जिल्हा परिषद , नगर परिषद , स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवाव्यात व नंतरच लोकसभेची उमेदवारी मागावी असे म्हणत थेट शिवानी वडेट्टीवार यांच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदविल्याचे दिसते आहे . अशा पद्धतीने काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत लथाळ्यांमुळे अजूनही दिल्ली दरबारी हाय कमांड द्वारे चंद्रपूरच्या लोकसभेच्या उमेदवारी बाबत कुठलाच निर्णय अजून पर्यंत घेण्यात आलेला नाही . तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीने मात्र कालच्या आशीर्वचन सभेमध्ये आपल्या प्रचाराचा नारळ फोडत सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयी वाटचालीच्या दिशेने जोरदार तयारी केल्याचे दिसत आहे .

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List