कोर्टीमक्ता येथील राज्य राखीव पोलीस बटालियन ठरणार देशातील सर्वोत्तम सुरक्षा केंद्र
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : दि.22 चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभेतील कोर्टीमक्ता गाव परिसरात प्रस्तावित राज्य राखीव पोलीस बटालियन प्रशिक्षण केंद्र उभे होत आहे. हे बटालियन देशातील सर्वोत्तम सुरक्षा केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. तसेच बटालियनच्या जागेची पाहणी करताना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.
राज्य राखीव पोलीस बटालियन जागेच्या पाहणी दरम्यान राज्य राखीव पोलीस बटालियनचे उपअधीक्षक प्रमोद लोखंडे, डॉ. सुशिल संघी, भाजपाचे पदाधिकारी काशीनाथ सिंग, समीर केणे, प्रज्वलंत कडू, लखन सिंग, कोर्टिमक्ताचे सरपंच गणेश टोंगे आदींची उपस्थिती होती.यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, बांधकामाच्या प्रारंभीच्या टप्प्यात जागेचे ड्रोन सर्वेक्षण, जागेची मोजणी करून वॉल कंपाऊंड उभारण्यावर भर द्यावा. संपूर्ण बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करताना आवश्यक बाबींचा समावेश करावा. यासोबतच, कोर्टीमक्ता गावातील सर्व शेतकरी बांधवांची बैठक घ्यावी. ज्यामध्ये, गावकऱ्यांसाठी उपलब्ध होणाऱ्या व्यवसायाच्या संधींबाबत माहिती दिली जाईल. शेतकरी बांधवांसाठी भाजीपाला उत्पादन, दुग्धव्यवसाय आणि तत्सम लघुउद्योगांसाठी अनुदान उपलब्ध करून देता येईल.
सर्व सोयी-सुविधांचा समावेश:
राज्य राखीव पोलीस बटालियन परिसरात ग्रीन ट्री प्लान्टेशन, पिण्याच्या पाण्याची सोय, सोलर उर्जा व्यवस्थापन आदी पर्यावरणपूरक सुविधा निर्माण कराव्यात. याशिवाय, जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी सोलर व्यवस्था करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
प्रशिक्षण केंद्रासाठी आधुनिक सुविधा:
बटालियन प्रशिक्षण केंद्र देशातील एक उत्तम सुविधा केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी अत्याधुनिक जिम, विविध खेळांचे मैदान, एमपी थिएटर, सीसीटीव्ही निगराणी यंत्रणा, पार्किंग, पेविंग ब्लॉक आणि आवश्यक फर्निचरची व्यवस्था करावी. सैनिक शाळेची पाहणी करून आर्किटेकच्या मदतीने बटालियन निर्मितीसाठी नियोजन करावे, असेही आ. श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
गाव आणि युवकांचा सर्वांगीण विकास :
कोर्टीमक्ता व लगतच्या गावांमध्ये 75 टक्के आदिवासींची लोकसंख्या आहे. त्यामुळे या भागाच्या विकासाला विशेष प्राधान्य देण्यात येईल. या प्रकल्पामुळे स्थानिक गावकऱ्यांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, गावकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कृषी आणि व्यवसाय क्षेत्रात सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. याशिवाय, गावातील युवक-युवतींची शैक्षणिक माहिती संकलित करून त्यामधून 100 निवडक युवक-युवतींना पोलीस आणि आर्मी भरतीसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. आदींच्या माध्यमातून कोर्टीमक्ता गावाचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे, असा विश्वास श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List