खळबळजनक : सुरेश धस - धनंजय मुंडे भेटीवर सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा....
आधुनिक केसरी
बारामती : मी ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि खुनाचे आरोप केले. त्याविरोधात राजकीय नैतिकतेच्या आधारावर सगळे पक्ष एकत्र येतील अशी मला अपेक्षा होती. मात्र सध्या सुरु असलेल्या घडामोडींमुळे मला वाईट वाटत आहे. मला कधीच वाटलं नव्हतं सुरेश धस धनंजय मुंडे यांना भेटतील. मी उद्या मस्साजोग आणि परळी येथे जाणार आहे. संतोष देशमुख आणि मुंडे कुटुंब यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी पाठीशी उभे राहणार आहोत', असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी बारामती प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की, सुरेश धस मॅनेज झाले याची शक्यता नाकारता येत नाही. बीडमध्ये कोणतंही राजकारण आणू नये. सुरेश धस यांच्याकडून मला खूप अपेक्षा होती. सुरेश धस मॅनेज आहेत का? याचं उत्तर चंद्रशेखर बावनकुळे देतील. कारण त्यांनीच चार तास मीटिंग अरेंज केली होती. अजित पवार म्हणाले की, माझ्यावर आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला होता. छगन भुजबळ, अशोक चव्हाण आणि आर.आर पाटील यांनी नैतिकता दाखवून राजीनामा दिला होता. राज्यात अनेक जणांनी नैतिकता दाखवून राजीनामा दिला होता. मला कधीच वाटलं नव्हतं सुरेश धस-धनंजय मुंडे यांना भेटतील. बावनकुळे म्हणाले, मीटिंग चार तास झाली. आम्हाला राजकारण करायचे नाही. पारदर्शक चौकशी होऊन न्याय मिळाला पाहिजे. अंजली दमानिया यांनी सर्व कागदपत्रे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिले आहेत. पारदर्शक चौकशी होऊन सरकारने नैतिकता दाखवली पाहिजे'. असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा शोधण्यासाठी राज्याची यंत्रणा उभी राहिली. पण संतोष देशमुख यांचे हत्या होऊन 70 दिवस लोटले तरी या प्रकरणातील पाचवा आरोपी अजूनही सापडला नाही. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. परभणी व बीड या दोन्ही घटनांतील पीडितांना न्याय मिळाला पाहिजे. बीडमधील देशमुख कुटुंबीय सध्या प्रचंड अस्वस्थ आहे. त्या कुटुंबाला आधार द्यायला कुणीही तयार नाही. त्यामुळे मी मंगळवारी त्यांना भेटण्यास जात आहे. देशमुख यांची मुलगी बारावी परीक्षेच्या काळात वणवण फिरत वडिलांसाठी न्याय मागत आहे. तिचे अश्रू या सरकारला दिसत नाहीत, असेही सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले.
पुढे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, दरम्यान, मुंबई महानगरपालिकेवर 28 फेब्रुवारीला मोर्चा काढला जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेत अनेक आव्हाने आहेत. अनेक डिपॉझिट काढली जात आहे, ही बाब चिंताजनक आहे. मुंबई महानगरपालिका कारभाराबाबत मोर्चा आहे. असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, अर्थात ते दुखवले गेले असतील. आमच्या आघाडी किंवा विरोधक जर असेल, तर एखाद्या सुसंस्कृत राजकारणामध्ये, फक्त चव्हाणसाहेबांचा फोटो लावून सुसंस्कृतपणा येत नाही. त्याच्यासाठी कृती देखील केली पाहिजे. शिवसेनेचे काही नेते दुखवले गेले असतील, मी त्यांच्याशी दिल्लीत देखील चर्चा केली. आम्ही सगळे मिळून एकमेकांना दुखवले जाणार नाही, यासाठी प्रयत्न करू. असे सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट केले आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, आमचे सरकार आले असते, तर कोणालाही वगळले नसते. आम्ही तर तीन हजार रुपये देणार होतो. आता महायुती सरकार अडीच लाखांच्यावर उत्पन्न असलेल्या महिलांना वगळणार आहे. ही योजना फक्त सत्तेसाठी होते, हे आता दिसू लागल्याचे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर महायुतीमधील भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मोठा निर्णय घेतला होता. आता निर्णयाची वाट पाहत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे म्हटले होते. आता राज्याच्या अर्थसंकल्पात याबाबत काय निर्णय होतो, याची वाट पाहू, असेही सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना म्हटले आहे.
About The Author
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List