विशेष संपादकीय : आग लागली तेल ओतायला चला
– डॉ. प्रभू गोरे , संपादक , संपर्क : 9075716739 सध्या महाराष्ट्रात भोंगा हा जीवन-मरणाचा प्रश्न झाला आहे. तापमानाचा पारा जस-जसा वाढत आहे तस-तसा भोंग्याच्या राजकारणाचाही पारा वाढू लागला आहे. जसे मनसेचे पक्षप्रमुख बोलत आहेत तसे सत्ताधारी आणि विरोधक रोज नव-नवे आरोप-प्रत्यारोप करत मस्त प्रसिद्धीच्या झोतात स्वत: न्हाऊन घेत आहेत. जनता उन्हाच्या चटक्यांसोबत महागाईच्या चटक्यांनी… Continue reading विशेष संपादकीय : आग लागली तेल ओतायला चला
– डॉ. प्रभू गोरे , संपादक , संपर्क : 9075716739
सध्या महाराष्ट्रात भोंगा हा जीवन-मरणाचा प्रश्न झाला आहे. तापमानाचा पारा जस-जसा वाढत आहे तस-तसा भोंग्याच्या राजकारणाचाही पारा वाढू लागला आहे. जसे मनसेचे पक्षप्रमुख बोलत आहेत तसे सत्ताधारी आणि विरोधक रोज नव-नवे आरोप-प्रत्यारोप करत मस्त प्रसिद्धीच्या झोतात स्वत: न्हाऊन घेत आहेत. जनता उन्हाच्या चटक्यांसोबत महागाईच्या चटक्यांनी बेहाल झाली आहे. वाहनांच्या आणि खाण्याच्याही तेलाचे भाव कधीचेच गगनाला जाऊन भिडले आहेत. आणखी थोड्या दिवसात ते गगन भेदून वर जातील. तरीही त्यावर कुणी बोलत नाही. रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही. जनतेचे वकील आणि कोतवाल असलेली माध्यमेही या ज्वलंत प्रश्नावर लिहीत -बोलत नाहीत. 2-4 रुपयांनी तेलाचे भाव वाढले त्या दिवशी फक्त नावाला बातमी झळकते. तेही कुठला राजकीय विषय नसला तरच. अन्यथा आता जनतेच्या हिताच्या बातम्यांपेक्षा पॅकेजच्या, टीआरपीच्या बातम्यांना जास्त प्रसिद्ध दिली जाते. टीआरपी आणि पॅकेजच्या नादात पत्रकारितेत काय-काय सुरू आहे आणि कसे-कसे सुरू आहे याचे एक संतापजनक उदाहरण पुढे आले आहे. महाराष्ट्रातील नामांकित काही दैनिकांत आलेली ही बातमी जशीच्या तशी खाली दिली आहे. ती वाचा…
बुलडाण्यात हिंदू-मुस्लिम एकोप्याचं अनोखं दर्शन, मुस्लिम बांधवांना भोंगा भेट
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील केळवद येथे हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना भोंगा भेट दिल्याची घटना घडली आहे. येथील हिंदू बांधवांनी एकता आणि बंधुत्वाचं प्रतीक बनत मुस्लिम बांधवांना मशिदीवर भोंगे लावण्यासाठी भोंगाच भेट दिलाय.
राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय. भोंगे न उतरवल्यास मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे राज्यात भोंग्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. दोन धर्मात तणाव निर्माण होतो आहे. मशिदीवरून भोंगे काढण्यासाठी वातावरण निर्मिती होत आहे. याला अपवाद म्हणजे बुलडाणा जिल्ह्यात घडलेलं हिंदू-मुस्लिम एकोप्याचं अनोखं दर्शन.
बुलडाणा तालुक्यातील केळवद गावात हिंदू बांधवांनी गावातील मशिदीला लाऊडस्पीकर म्हणजेच भोंगा भेट दिला आहे. विशेष म्हणजे या केळवद परिसरात एकही मशीद नाही. तरी, शेजारील किन्होळा मुस्लिम बांधवांना बोलावून ईदच्या शुभेच्छांसह हा भोंगा त्यांना भेट देण्यात आला.
वाचक मायबापहो आता तुम्हीच सांगा हा आगीत तेल ओतण्याचा प्रकार आहे की नाही. बुलडाणा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेत हिंदू-मुस्लिम एकोप्याचे अनोखे दर्शन घडले, असे या वृत्तपत्राचे म्हणणे आहे. यात कसला आलाय ढेकळाचा एकोपा! हा तर निव्वळ प्रसिद्धीचा स्टंट आहे किंवा यामागे कुठल्या तरी राजकीय पक्षाचा हात आहे. कारण कुत्रा माणसाला चावला तर बातमी होत नाही पण माणूस कुत्र्याला चावला तर बातमी होते, ही व्याख्या आम्हा वृत्तपत्रात बातम्या लिहिणाऱ्यांपुरतीच मर्यादित होती. आता तिचा उपयोग सर्वसामान्य जनताही करू लागल्याचे पाहून अवघड वाटू लागले आहे. या गावातील महात्म्यांनी भोंगा भेट देण्याऐवजी शंभर-दोनशे झाडांची रोपे, पाण्यासाठी काही साधने असे बरेच काही त्यांच्यासाठी आणि इतरांसाठीही उपयोगी साहित्य द्यायला पाहिजे होते. पण असे केले तर ब्रेकिंग न्यूज झाली नसती. हिंदु-मुस्लिम एकोपाही झाला नसता ना…काय अवघड आहे राव…कुठे चाललोय आपण? कुठे ओढून नेतायत आपल्याला? याचा हल्ली कुणी विचारच करेनासे झालेय. ग्रामीण भागात सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. औरंगाबादसारख्या महानगरात चक्क नऊ-दहा दिवसांनंतर पाणी सोडले जात आहे. शेतकऱ्यांना पेरणीच्या आणि सर्वसामान्यांना मुलांच्या शिक्षणाचे वेध लागून झोप उडाली आहे. कोरोना महामारीतून बाहेर पडताना व्यापार -उद्योग करणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे आणि आपले पुढारी, सरकार, विरोधक भोंग्याच्या राजकारणाच्या आगीत पोळी भाजून घेत आहेत. काही सर्वसामान्य लोक भोंगे भेट देऊन आणि काही माध्यमं त्यांना प्रसिद्धी देऊन या आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. पण एक लक्षात ठेवा आगीत तेल ओतणार्यांचे हात जळतात असे म्हणतात…अशा आगीत मात्र तेल ओतणारे जळून भस्मसात होतात. म्हणून एकच सल्ला आम्ही देऊ… वेळीच सावध व्हा!
Comment List