नाम में क्या है?
विशेष संपादकीय ! सूड, अपमान, धोका, बदला, आरोप-प्रत्यारोप, गद्दारी हे राजकारणाच्या डिजिटल डायरीतले शब्द अलीकडे क्षणाक्षणाला लाखो राजकारणी सर्च करत आहेत…
विशेष संपादकीय
डॉ. प्रभू गोरे,संपादक
सूड, अपमान, धोका, बदला, आरोप-प्रत्यारोप, गद्दारी हे राजकारणाच्या डिजिटल डायरीतले शब्द अलीकडे क्षणाक्षणाला लाखो राजकारणी सर्च करत आहेत. सत्ता, खुर्ची आली की जनतेचे काम कमी आणि विरोधकांचेच काम तमाम करण्याचा अजेंडा काही अपवाद वगळता जवळपास सर्वच राजकीय पक्ष राबवत आहेत. तिकडे टोकीओत ऑलम्पिकमध्ये आपले खेळाडू देशासाठी जीव तोडून खेळत असताना इकडे देशात राजकीय ऑलम्पिक सुरू झाले आहे. आपले बदलवीर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलरत्न पुरस्कारावरून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव काढून टाकले व मेजर ध्यानचंद यांचे नाव दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी काय बदलतील याचा कोणालाही अंदाज घेता येत नाही. नोटाबंदीच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे ते बदलण्यात किती माहीर आहेत, याचा साक्षात्कार संपूर्ण जगाला आला आहे. यामुळे कालच्या बदलाचा फारसा परिणाम काँग्रेस वगळता इतर कोणावरही झाला नाही आणि होण्याचे तसे काही कारणही नाही. खेळांच्या संबंधित पुरस्काराला खेळाडूचेच नाव शोभून दिसते. नामांतराचे स्पष्टीकरण देताना पंतप्रधान म्हणाले की, देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या नावे देणे योग्य आहे. देशवासियांनी मांडलेल्या मतांबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मेजर ध्यानचंद हे भारताला सन्मान आणि आदर मिळवून देणाऱ्या भारतातील महत्वाच्या खेळाडूंपैकी एक होते. १९९१-१९९२ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली होती. बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हा पुरस्कार मिळवणारे पहिले खेळाडू ठरले होते. याशिवाय आतापर्यंत लिअँडर पेस, सचिन तेंडुलकर, धनराज पिल्ले, पुलेला गोपिचंद, अभिनव बिंद्रा, अंजू बॉबी जॉर्ज, मेरी कोम आणि राणी रामपाल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. असा देशातला सर्वोच्च पुरस्कार सध्या नामांतरामुळे बदनाम होऊ लागला आहे. राजीव गांधी पंतप्रधान म्हणून देशासाठी वंदनीय आहेत. पण खेळाच्या पुरस्काराला त्यांचे नाव तेव्हा का दिले गेले हे त्या देणाऱ्यांनाच ठाऊक. एखाद्या गोष्टीला नाव देताना थोडा तरी मागचा पुढचा विचार करायला पाहिजे की नाही? का सत्ता आहे म्हणून मनाला येईल ते करायचे. देशात अशा अनेक गोष्टी आहेत. त्यांचा आणि त्यांना देण्यात आलेल्या नावांचा काहीही संबंध नाही. मंत्रिमंडळाचे खातेवाटप करताना जसे मागासवर्गीय नेत्याला समाज कल्याण, महिलेला महिला व बालकल्याण, आदिवासी पुढाऱ्याला आदिवासी विकास खाते देता तसा विचार पुरस्काराला, वास्तूला, योजनेला नाव देतानाही का करत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलरत्नचे नामांतर केले. ते करताना का केले, याचे स्पष्टीकरणही दिले. आता त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून स्टेडियमला जे त्याचे नाव देण्यात आले आहे तेही बदलून टाकावे. अन्यथा आज त्यांनी जे पेरले आहे ते उद्या सरकार बदलल्यावर उगवल्याशिवाय राहणार नाही. शेवटी सर्वच नामांतरवीरांना एक सल्ला आहे, “देना ही है तो काम देख के नाम दो। वरना ऐसे नाम मे क्या रखा है ।”
Comment List