मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय होणार..!
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : मुल येथे नवीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय व्हावे, यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांनी पाठपुरावा करून हा विषय लावून धरला. आता लवकरच हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार आहे. त्यामुळे आ. श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.*
वाघांचा जिल्हा म्हणून नावलौकिक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षण घ्यावे. जिल्ह्याचा नावलौकिक देशात वाढवावा. यासाठी जिल्ह्यातील मुल येथे नवीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता. यासंदर्भात मंगळवार, दि. ७ जानेवारीला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. आ. श्री. मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे झालेल्या या बैठकीत तंत्रनिकेतन महाविद्यालयासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली. तसेच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुलच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा प्रस्ताव मांडण्यासंदर्भात सूचना व निर्देश दिले. महाविद्यालयासंदर्भात वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल आ. श्री. मुनगंटीवार यांनी विभागाचे अप्पर मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी यांचे आभार मानले आहेत.चंद्रपूर सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाच्या माध्यमातून आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात येण्यास मदत होणार असल्याचा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
*आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिले होते निर्देश*
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुल येथे शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने त्यांनी तंत्रशिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश दिले होते, हे विशेष.
या विद्यार्थ्यांना होणार लाभ
या उपक्रमामुळे मूलसह पोंभूर्णा, सावली, सिंदेवाही आणि चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना लाभ होणार आहे. मुल येथे यापूर्वीच शासकीय कृषी महाविद्यालय सुरू झाल्याने शहराच्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान मिळत आहे. शासकीय पॉलिटेक्निक सुरू झाल्यास मुल हे शिक्षणासाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
Comment List