लाचखोरी : बल्लारशाह पोलीस उपनिरीक्षकाविरुध्द ( ACB ) अॅन्टी करप्शन ब्युरोची कारवाई
आधुनिक केसरी न्यूज
प्रेम गेहलोत
बल्लारशाह : पोलीस स्टेशन बल्लारशाह, जि. चंद्रपूर येथील हुसेन शहा, पोलीस उपनिरीक्षक यांचेविरूध्द ५०,०००/- रूपये लाच मागणी संबंधाने ( ACB ) अॅन्टी करप्शन ब्युरो चंद्रपूर यांचे पथकाने कार्यवाही केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांचे लाकुड, बांबु, तेंदुपत्ता इत्यादी मालावर कमिशन आकारून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ट्रकने माल पोहचविण्याचे काम करतात. ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान तक्रारदार यांनी १९,०२,०००/- रूपयाचा तेंदुपत्त्याचा माल गडचिरोली जिल्हयातुन चंद्रपूर जिल्हयातील बामणी येथे पोहचविलेला होता. त्या मालाचे त्यांचे एकुण १९,०२,०००/- रू. हे व्यापाऱ्यांकडुन येणे बाकी होते. परंतु तीन-चार महिन्यांपासुन सदरचे व्यापारी पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते म्हणुन तक्रारदार यांनी पोलीस स्टेशन बल्लारशाह येथे लेखी तक्रार दिलेली होती. तेव्हा सदर १९,०२,०००/-रू ची रक्कम व्यापाऱ्यांकडुन वसुल करून देणेकामी एकुण रक्कमेच्या वीस टक्के रक्कम (अंदाजे ३,८०,०००/- रू) ची मागणी केलेली होती.
तक्रारदार यांच्या सदर व्यवहारात नंतर सेटलमेन्ट होवुन त्यांना फक्त गुंतवलेली मुद्दल १६,१५,०००/- रू. व्यापाऱ्यांकडुन प्राप्त झाली. सदर व्यापारी व तक्रारदार यांच्यामध्ये समझोता होवुन सदर प्रकरण त्यांनी आपसात मिटवलेले होते. तक्रारदार यांनी पोलीस स्टेशनला व्यापाऱ्यांविरूध्द दिलेला लेखी तक्रारअर्ज मागे घेत असल्याबाबत आरोपीत लोकसेवक हुसेन शहा, पोलीस उपनिरीक्षक, पो.स्टे. बल्लारशाह यांना सांगीतले असता आरोपी लोकसेवक यांनी दिलेला तक्रार अर्ज मागे घेण्याकरीता तक्रारदारास वारंवार फोन करून पैश्याची मागणी करीत होते. तसेच वरिष्ठांकडुन खोट्या गुन्हयात अडकविण्याची भिती दाखवित होते.
त्यामुळे तक्रारदार यांनी होणाऱ्या मानसिक त्रासाला वैतागुन दि. ०८/०१/२०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथे येवुन दिनांक तक्रार नोंदविली. प्राप्त तक्रारीवरून वेळोवेळी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान आरोपीत लोकसेवक हुसेन शहा, पोलीस उपनिरीक्षक, पो.स्टे. बल्लारशाह यांनी तक्रारदार यांचेसोबत तडजोड करून ५०,०००/- रू. घेण्याचे मान्य केले. त्यावरून आज दि. १३/०१/२०२४ रोजी सापळा कार्यवाही आयोजीत करून तक्रारदार यांना पंचासह लाचरक्कम घेवुन आरोपी लोकसेवक यांचेकडे पाठविण्यात आले असता आरोपी लोकसेवक यांना संशय आल्याने घटनास्थळावरून पळून गेले. त्यावरून आज दि. १३/०१/२०२४ रोजी आलोसे हुसेन शहा, पोलीस उपनिरीक्षक, पो.स्टे. बल्लारशाह यांचेविरूध्द लाच मागणीवरून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असुन आलोसे हे मिळुन येताच अटक करण्याची तजविज ठेवण्यात आलेली आहे.
सदरची कार्यवाही श्री. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, श्री. सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, सफौ रमेश दुपारे, पो.हवा. हिवराज नेवारे, पो. हवा. अरूण हटवार, पो. हवा. नरेशकुमार नन्नावरे,, पोशि वैभव गाडगे, अमोल सिडाम, प्रदिप ताडाम, राकेश जांभुळकर, म.पो.शि. मेघा मोहुर्ले, पुष्पा काचोळे, चापोशि सतिश सिडाम सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर तसेच चापोशि संदीप कौरोसे, मो.प.वि. चंद्रपूर यांनी यशस्वी पार पाडली आहे. हॅश व्हॅल्यु घेण्यात आलेली आहे.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
Comment List