नवरात्रोत्सव विशेष : ६५० किल्ले सर करणारी भारतातील पहिली महिला गडरागिणी "हमिदा खान" यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास..!
हमिदा खान यांची नवरात्रोत्सवाची आठवी माळ
आधुनिक केसरी न्यूज
लेखिका : सौ किशोरी पाटील
आज अष्टमीचा दिवस मोठा भाग्याचा आहे. माझी मैत्रीण शिवरायांची निस्सीम भक्त, गड किल्ल्यावर प्रेम करणारी दुर्गकन्या हमिदा अन्वर खान नालासोपारा वसई विरार येथे वास्तव्यास आहे.नवरात्रोत्सवाच्या माळेत अशा धाडसी गडरागिणी गिर्यारोहक, मैत्रीणी विषयी लिहिण्याचा योग आला. २०१९ मध्ये मी आणि हमिदा खान दोघींनी मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली. मैत्रीण हमिदा खान यांचा जन्म मुंबईत झाला.गडकिल्ले सर करतात म्हणून त्यांना गडरागिणी उपाधी मिळाली. मराठमोळ्या हमिदा खान यांनी आपल्या जीवनातील जास्तीत जास्त वेळ गड किल्ले, पुरातन वस्तू संशोधन व संवर्धन ह्या साठी देऊन आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. हमिदा खान यांनी एम.ए. इतिहास अरेबिक फारसी मोडी ब्राम्ही, नेवारी ग्रंथ,शारदा लिपीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
सुरुवातीपासून मैदानी खेळाची आवड असल्याने प्रशिक्षण घेतले. लाठी काठी, दांडपट्टा, तलवार,विटा आदींचा समावेश आहे. योगायोग असा की रायगडावर अष्टमीच्या दिवशी देवीची आणि विरार जीवदानी देवीची हमिदा खान ओटी भरते याच दिवशी लेख प्रकाशित होत आहे. किल्ले रायगडावर त्यांचा राज्याभिषेक सोहळ्यात मोठा सहभाग असतो,यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे औक्षण, जलाभिषेक करण्याचा मान दिला जातो.यावेळी गडावरील शिरकाई देवी पूजनाची तयारी वस्त्र अलंकार पुजाअर्चा यात मोलाचं योगदान असतं. हे सातत्याने ३२ वर्षांपासून सुरू आहे. शिवराज्याभिषेक सोहळा समिती दुर्गराज रायगडच्या त्या संस्थापक सदस्य आहेत. भटकंती व गिर्यारोहणाचा ध्यास व आवड मनापासून जोपासताना. तहान भूक त्रास विसरून, अत्यंत चिकाटीने ३५ वर्षात महाराष्ट्र जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी, राजस्थान,कर्नाटक,आंध्रप्रदेश मिळून ६५० किल्ले सर करणारी भारतातील एकमेव महिला असल्याचा त्यांना अभिमान आहे. यामुळेच ज्येष्ठ गिर्यारोहक, थोर इतिहास तज्ञ श्री के. तुकाराम जाधव यांनी दुर्गकन्या उपाधी दिली. हिरकणी ही संबोधतात. शस्त्र संग्रहक श्री गिरीश जाधव यांनी गडरागिणी उपाधी दिली.
शिवसंत राजा शिवबा प्रसार मंडळ, सावित्रीबाई पुरस्कार ईशा टूर जिजाऊ पुरस्कार, किल्ले लळिंग, कोकण इतिहास परिषद. गिरीमित्र संमेलन, दुर्गपरीषद,प्राधिकरण, किल्ले रायगड या संस्थाकडून सन्मान व पुरस्कार तर जागतिक महिला दिनी वसई विरार नालासोपारा महानगरपालिका तर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आला.टिव्ही रेडिओ वर्तमानपत्रात अनेक मुलाखती तसेच झी टीव्ही वर " आम्ही सारे खवय्ये " कार्यक्रमात सहभाग.हल्लीच साजरा गोजरा अवघड गड चढला तो तामिळनाडू वेल्लूर येथील किल्ला जो शिवाजी महाराजांनी बांधला. विशेष बाब म्हणजे तामिळनाडू येथे सह्याद्री भूषण पुरस्काराने सन्मानित केले.दक्षिण दिग्विजय किल्ले जिंजी स्वराज्याची ३ राजधानी जिंजी येथे सह्याद्री भ्रमंती भूषण हा पुरस्कार हिंदवी परिवाराकडून असा अतिशय प्रेरणादायी थक्क करणारा प्रवास जो आजच्या तरूण पिढीसाठी मार्गदर्शक आहे.
शिवराज्याभिषेक तिथीप्रमाणे व्हावा. रायगडावर सांजेला दिवबत्ती करावी या विनंतीस मा. संभाजी राजे यानी मान्यता दिली.त्याचं एकच म्हणणं आहे निसर्ग भरभरून देतो तो भेदभाव करीत नाही. आपलंही कर्तव्य आहे की आपण त्याची जोपासना करावी. आपला इतिहास, संस्कृती परंपरा गडकोट किल्ले महाराष्ट्राचे वैभव सर्वांनी मिळून जोपासू आणि भावी पिढीला हे वैभव याची देही याची डोळा पहायला मिळेल असे आवर्जून सांगते. अशी ही गडकोट किल्यावर प्रेम करणारी अनोखी नवदुर्गा हमिदा खान यांना सलाम.
Comment List