वयाच्या साठीत पारंपारिक लोकगितांचे समाजप्रबोधन करणाऱ्या नवदुर्गा..!
सौ.नंदा गोतारणे यांची नवरात्रोत्सवाची सहावी माळ
आधुनिक केसरी न्यूज
लेखिका : किशोरी शंकर पाटील
पालघर : जिल्हा सागरी, नागरी व डोंगरी अंगाने विस्तारला आहे. अनेक बोली भाषा बोलणारा बोलक समाज या जिल्हात पिढ्यानपिढ्या राहतो. वारली, कातकरी, आगरी, कोळी, वाढवळ, कुणबी, पाचकळशी यां समाजाच्या बोली या मौखिक स्वरूपातील असून हे बोलक समाज याच भाषेतून आपले विधी, सणउत्सव, समारंभ साजरे करतात. शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी तसेच प्रसिद्ध वाडा कोलम तांदूळ पिकवणारा कुणबी समाज या पालघर जिल्हात बहुसंख्येने वास्तव्यास आहे. या समाजाच्या कुणबी बोलीतून प्रामुख्याने व्यवहार चालतो. मौखिक असणारी ही भाषालहेजा,व्याकरण, लेखन उच्चारण यातून इतर बोली भाषांपेक्षा वेगळी व दखलघेण्यायोग्य ठरते. या समाजात लग्नसमारंभात गायली जाणारी लग्नगिते अर्थात धवला, गौरी - गणपतीची गिते, जात्यावरची गाणी, बाया घालवायची गाणी, अंगाईगीते, होळीची गाणी अशा साहीत्यीक अंगाने ही बोलीभाषा वंशपरंपरागत समृद्ध आहे.
सौ.नंदा तुकाराम गोतारणे या गातेस बु, ता. वाडा, जिल्हा पालघर येथिल खेडेगावात राहणाऱ्या महिला असून त्यांनी हा मौखिक परंपरेतून आलेला बोली भाषेतील ठेवा संवर्धन करण्यासाठी त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मागील दहा वर्षापासून ही लोककला, लोक साहीत्य टिकवण्यासाठी त्या अटोकाट प्रयत्न करत आहेत. प्रबोधन कार्यक्रमांच्या निमित्ताने ठिकठिकाणी स्वखर्चाने जावून विनामूल्य त्या लग्नसोहळयात ही लग्नगिते (धवला) गायन करतात. पूर्वी लग्नात तेला, बाशिंगा, उटणी, हालदी अश्या कार्यक्रमात धवला गायन केल्याशिवाय रंगत येत नसायची. मात्र आधुनिकतेच्या या प्रवाहात हे सर्व मागे पडले मात्र यातून बोलीभाषा, लोकसंस्कृतीची समृद्धता लोप पावते आहे. व तिच टिकवण्यासाठी मी हा वसा घेतला आहे. असे सौ. नंदा तुकाराम गोतारणे सांगतात. आज पर्यत त्यांनी शंभराहून अधिक लोकगितांचे कार्यक्रम केले असून मराठी या अभिजात भाषेच्या या बोलीभाषेच्या संवर्धनात युवक, युवतींनी पुढे यावे व ही लोकगीते शिकावीत यासाठी शाळा महाविद्यालयात त्या याचे प्रबोधन करत असतात. लोकसंस्कृतीची समृद्ध परंपरा व वडिलोपार्जित हा वारसा जपणाऱ्या सौ. नंदा तुकाराम गोतारणे आज वयाच्या साठाव्या वर्षांत ही हे समाजप्रबोधन करणाऱ्या खऱ्या नवदुर्गा आहेत.
Comment List