तलाठी भरतीचा मार्ग मोकळा ; मॅटने स्थगिती उठवली
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिलेले ’जैसे थे’ आदेश मागे घेण्यात आल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तलाठीभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. अश्विनी कोळसे, गोरखनाथ गव्हाणे व नितीन मगरे, योगेश्वरी चिंतामणी यांनी दाखल केलेल्या हस्तक्षेप अर्जांवर न्यायाधिकरणाने वरील आदेश दिला. तलाठीपदी निवड होऊन नियुक्ती आदेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
🔹सामाईक परीक्षेच्या दुरूस्त उत्तरसुचीमुळे आपल्या गुणांकनावर विपरीत परिणाम झाला आहे त्यामुळे अंतिम निवडसुची रद्द करून त्यात आपल्या नावाचा समावेश करावा अशी मूळ याचिका मनीषा कंगले व शुभम बहुरे या उमेदवारांनी न्यायाधिकरणाच्या संभाजीनगर खंडपीठात दाखल केली आहे. मुंबई न्यायाधिकरणाने अशाच स्वरूपाच्या याचिकेत ’जैसे थे’ आदेश दिल्याने संभाजीनगर जिल्ह्यातील तलाठीभरती ’जैसे थे’ ठेवण्याचा आदेश येथील खंडपीठाने
दि. 19 एप्रिल रोजी दिला. परिणामी, संपूर्ण जिल्ह्यातील तलाठी पदाची नियुक्तीप्रक्रिया थांबविण्यात आली.
🔹 दरम्यान, मुंबई न्यायाधिकरणापुढील प्रलंबित याचिकेत अंतिम सुनावणी होऊन तेथील याचिकाकर्त्यांची याचिका मुख्य पीठाने खारीज केली.
समान विषयासंबंधीची याचिका मुख्य पीठाने खारीज केल्याने
संभाजीनगर येथील याचिकादेखील फेटाळण्यात यावी अथवा न्यायाधिकरणाने दिलेला ‘जैसे थे’ आदेश शिथील करण्यात यावा अशी विनंती हस्तक्षेप अर्जदारांच्यावतीने संभाजीनगर खंडपीठापुढे करण्यात आली.
🔸 निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यास भरतीप्रक्रिया अधिक लांबणीवर पडेल, तात्काळ पदभरती झाल्यास महसूल विभागावरील कामाचा बोजा कमी होईल त्यामुळे भारतीप्रक्रियेवरील स्टे उठवण्यात यावा असा युक्तिवाद हस्तक्षेप अर्जदारांच्यावतीने करण्यात आला.
तो मान्य करून न्यायाधिकरणाने आपला स्थगिती आदेश मागे घेतला. मूळ अर्जाद्वारे दाद मागणार्या दोघा याचिकाकर्त्यांपुरती दोन पदे रिक्त ठेवून उर्वरीत 92 रिक्त जागांसाठी नियुक्ती आदेश जारी करण्यास कोणताही अडसर नसेल असे न्यायाधिकरणाने स्पष्ट केले. हस्तक्षेप अर्जदारांच्यावतीने ॲड चैतन्य धारूरकर व ॲड महेश भोसले यांनी काम पाहिले.
Comment List