पत्रकारीता आणि प्रशासन समाजरथाची दोन चाके-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजीनगर :- समाजाच्या विविध घटकांपर्यंत विकासाच्या योजना, उपाययोजना पोहोचविणे हे प्रशासनाचे काम असते तर पत्रकारीते मार्फत जनतेपर्यंत माहिती पोहोचविली जाते, त्यामुळे पत्रकारीता आणि प्रशासन ही समाजरथाची दोन चाके आहेत, परस्परांच्या सहकार्यावरच समाजाची प्रगती अवलंबून आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात दर्पण दिनाचे (दि.६) औचित्य साधून आज पत्रकार सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आला. या कार्यक्रमास विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष डॉ. माधव सावरगावे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदार, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, तहसिलदार रमेश मुनलोड, माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास, सहायक संचालक गणेश फुंदे आदी उपस्थित होते,
प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. या कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, ज्या काळात बाळशास्त्री जांभेकरांनी पत्रकारिता केली. तो काळ, नंतरचा स्वातंत्र्य संग्रामाचा काळ आणि आताचा काळ यात फरक आहे. प्रश्नांचे स्वरुप बदलले आहे. असे असले तरी पत्रकारितेची जबाबदारी तिच आहे. सध्या संस्कृती आणि संस्कारापासुन व्यक्ति दुरावत असल्याचा प्रश्न समाजापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे कन्याभ्रुण हत्या, गर्भलिंग निदान, व्यसनाधीनता, कौटुंबिक हिंसाचार, वृद्धावस्थेत आई वडिलांचा मुलांनी सांभाळ न करणे असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ह्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत तर त्यासाठी समाज प्रबोधन करणे आवश्यक असून ती जबाबदारी पत्रकारांनी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले. पत्रकारांच्या आरोग्य तपासणीसाठी प्रशासन पुढाकार घेईल, असेही सांगितले.
डॉ. माधव सावरगावे म्हणाले की, पत्रकारांचे विविध प्रश्न असतात ते सोडविण्यासाठी शासन व शासनाने नियुक्त केलेल्या समित्या आपल्या स्तरावर प्रयत्न करीत असतात. त्यामाध्यमातून पत्रकारांचे अनेक प्रश्न सोडविण्यात येत आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पत्रकार यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. पत्रकार हे प्रशासनाला सहकार्य करीत असतात. चांगला समाज घडविण्यासाठी पत्रकार हे नेहमीच प्रशासनासोबत आहेत, असे मत डॉ. सावरगावे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी सिद्धार्थ गोदाम, डॉ. अब्दुल कदीर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. मिलिंद दुसाने यांनी, सुत्रसंचालन कांचन जोशी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.मीरा ढास यांनी केले. कार्यक्रमाला सर्व प्रमुख पत्रकार उपस्थित होते.
०००००
Comment List