गुरूविना कोण दाखवील वाट..!
आधुनिक केसरी न्यूज
सौ.किशोरी शंकर पाटील
गुरूविना कोण दाखवील वाट आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट पौर्णिमा म्हणजे प्रकाश गुरू शिष्याला ज्ञान देतात. ज्ञानरूपी प्रकाश शिष्यापर्यंत पोहचवतात.म्हणूनच गुरुंच्या ऋणाशी कृतज्ञ रहावे. नतमस्तक व्हावे. आयुष्याचे मोल जाणावे.गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरूर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम: गुरु म्हणजे ब्रम्हा विष्णू महेश ईश्वराचे दुसरे रूप आषाढ शुद्ध पौर्णिमा गुरुपौर्णिमा. गुरुप्रती आदरभाव व्यक्त करण्याचा दिवस. गुरू ज्ञानाचा महासागर आहे. पाणी घेण्यासाठी घट भरताना खाली वाकून पाणी भरावे लागते, तेव्हाच पाणी भरता येते. तद्वत गुरूठायी नम्रता हवीच त्याशिवाय ज्ञानप्राप्ती नाही.
आईवडील गुरू प्रथम,ठायी ठायी शिकवती ज्ञान प्रकाश शिक्षक देती,सुजाण नागरिक घडवती आपल्या जीवनात गुरूंचे नानाविध रूपे पहावयास मिळतात. आईवडील आपले पहिले गुरू, असले तरी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण शैक्षणिक, शारीरीक, सामाजिक, अध्यात्मिक विकासासाठी गुरूच कारणीभूत ठरतो, शाळेतील शिक्षक. भविष्यात एक चांगला नागरीक घडवण्यासाठी गुरूच बालमनांवर प्रभाव टाकतात. जसा कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन मडकं घडवतो तसेच. निसर्गाकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. झाडे, पानेफुले, पाणी, पशुपक्षी,समुद्र, नदी इ. तसेच चांगली पुस्तके ग्रंथ देखील आपले गुरूच आहेत. मित्र मैत्रिणी जे जे लोक आपल्याला जगण्यासाठी चांगले संस्कार देतात, ते गुरूच आहेत. गुरूला वय जातीचे बंधन नसते. गुरूप्रमाणे शिष्य घडत असतो.
गुरू पौर्णिमेला आदिगुरू व्यासांचा जन्म झाला. म्हणून व्यास पौर्णिमा ही म्हणतात. ज्ञानेश्वरांनी सुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ' व्यासांचा मागोवा घे तू ' असे व्यास ऋषींबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. आता काळ बदलला शिक्षणपद्धती बदलली असली तरी गुरु शिष्याचे नाते बदलले नाही. मुलांनी आपल्या गुरुंच्या आज्ञेचे पालन करायला हवे. त्यांचा आदरसन्मान ठेवायला हवा. गुरुंच्या शिकवलेल्या ज्ञानाने शाळा, आईवडील, देशाचा आणि गुरुचाही नावलौकिक वाढवायचा प्रयत्न करणे आज काळजी गरज आहे.
Comment List