मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
आधुनिक केसरी न्यूज
नवी दिल्ली : 13 मार्च महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेत, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. राज्य सरकारने गडचिरोलीत पोलाद क्षेत्रात मोठा पुढाकार घेतला असून, गडचिरोली आता देशाची स्टीलसिटी म्हणून विकसित होत आहे. यादृष्टीने गडचिरोलीला माईनिंग हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. नागपूर विमानतळाच्या कामाला सुद्धा गती देण्यात आली असून, त्यात केंद्र सरकारसंदर्भातील काही विषयांबाबत सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी चर्चा केली. यामुळे विमानतळ कामातील अडसर आता लवकरच दूर होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांना 15 व्या वित्त आयोगाचा निधी लवकरात लवकर मिळावा, असाही एक विषय या चर्चेत होता. या सर्व बाबतीत सकारात्मक प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
वर्ल्ड ऑडिओ, व्हीज्युअल अँड एन्टरटेंटमेंट समिट आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. 1 ते 4 मे या कालावधीत मुंबईत ही समिट होणार आहे. याचनिमित्ताने मुंबईत आयआयटीच्या धर्तीवर आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्युट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी) सुद्धा स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी सुद्धा केंद्र सरकार निधी देणार आहे, त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List