अखेर ब्रिजभूषण पाझारे, अहेतेशाम अली यांची भाजपातून हकालपट्टी
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपा मधून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक असलेल्या परंतु उमेदवारी न मिळाल्यामुळे बंड करणाऱ्या भाजपाच्या काही नेत्यांची पक्षश्रेष्ठींनी पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षासोबत बंडखोरी करणाऱ्या 40 जणांना अखेर बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पक्षाने सांगूनही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने पक्षाकडून ही कारवाई केल्याचे सांगितल्या जात आहे. हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये चंद्रपुरातील ब्रिजभूषण पाझारे, ब्रह्मपुरी वसंत वारजूरकर, वरोरा येथील माजी नगराध्यक्ष अहतेशाम अली ,राजू गायकवाड यांच्यासह एकूण 40 जणांवर पक्षातर्फे कारवाई करण्यात आली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही बंडखोरी करणाऱ्यांना पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित करणार असल्याचे सांगितले होते.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून भाजपचे जिल्हा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे हे निवडणूक लढविण्यास इच्छुक होते, मात्र ऐनवेळी चंद्रपुरातील अपक्ष आमदार जोरगेवार यांना उमेदवारी देण्यात आल्याने पाझारे यांचा पक्षातून अपेक्षाभंग झाला.
उमेदवारी न मिळाल्याने पाझारे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्धार केला, भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांच्याकडे पदाचा राजीनामा देखील सोपविला होता. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर त्यांना भाजप पक्षाने अर्ज मागे घेण्यास सांगितले मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला. त्यामुळे पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आहे. 5 नोव्हेंबर रोजी पक्ष सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी भाजप पक्षातील 40 जणांची पक्षातून हकालपट्टी केली असल्याचे पत्र जारी केले. मात्र ब्रिजभूषण पाझारे, अहेतशाम अली, वसंत वारजूरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी अनेक भाजप पदाधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित होते, त्यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comment List